Corona Vaccine वर ICMR नं दिलं स्पष्टीकरण तर Experts म्हणाले 2021 च्यापूर्वी ‘अशक्य’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतासह जगातील अनेक देशात कोरोना वॅक्सीनचे संशोधन दिवस-रात्र सुरू आहे. वॅक्सीनच्या शोधासाठी या देशांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तरीही वॅक्सीनची ट्रायल अजून पूर्ण झालेली नाही. मात्र, अनेक देशांनी दावा केला आहे की, वॅक्सीनची ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. जगातील 11 कंपन्या वॅक्सीन तयार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. ह्यूमन ट्रायल फेजपर्यंत पोहचणार्‍या या 11 कंपन्यांपैकी 2 भारतीय आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या सहकार्याने भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाने वॅक्सीन डेव्हलप केली आहे, ज्यांची ह्यूमन ट्रायल अजून झालेली नाही.

भारताच्या दोन कंपन्या वॅक्सीनच्या रेसमध्ये सर्वात पुढे

दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरने दावा केला होता की, 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची वॅक्सीन तयार केली जाईल. आयसीएमआरच्या या दाव्यावर तज्ज्ञांसह भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाने सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एवढ्या कमी वेळात हे शक्य नाही. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, भारतात सुद्धा कोविड-19 वॅक्सीनबाबत विज्ञान मंत्रालय आणि आयसीएमआरचे दावे का वेगवेगळे आहेत? अखेर 15 ऑगस्टपर्यंत आयसीएमआरने का डेडलाईन दिली?

विज्ञान मंत्रालय आणि आयसीएमआरचे वेगवेगळे दावे

विज्ञान आणि औद्योगिक मंत्रालयाने रविवारी म्हटले होते की, जगात तयार होत असलेल्या 140 वॅक्सीनपैकी 11 ह्यूमन ट्रायल फेजमध्ये पोहचल्या आहेत, परंतु ही शक्यता नाही की, यापैकी कोणतीही वॅक्सीन 2021 च्या अगोदर मोठ्याप्रमाणात वापरासाठी उपलब्ध होईल. तर 2 जुलैला आयसीएमआरने वॅक्सीनच्या ट्रायलसाठी निवडलेल्या 12 क्लिनिकल साईटच्या प्रमुखांना पत्र लिहून वॅक्सीनची ट्रायल 15 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आयसीएमआरच्या या पत्रानंतर देशात मोठी वाद निर्माण झाला होता.

आयसीएमआरच्या या पत्रावर आरोग्य तज्ज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले की, वॅक्सीन लाँच करण्याच्या एवढ्या घाईमुळे गुणवत्तेशी तडजोड होऊ नये. अशा डेडलाइनमध्ये काम केल्याने अर्धवट डेटासह वॅक्सीन लाँच होईल.

आयसीएमआरच्या दाव्यावर तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

डॉ. प्रभात रंजन डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. प्रभात कुमार म्हणाले, कोविड-19 वॅक्सीनच्या शोधात संपूर्ण जग लागले आहे, परंतु अजूनपर्यंत कुठूनही शास्त्रीय निष्कर्ष मिळालेले नाहीत. अजूनपर्यंत ट्रायलमध्ये कोणत्याही वॅक्सीनने इन्फेक्शन रोखल्याची बाब समोर आलेली नाही. ऑक्सफोर्ड किंवा यूएसमध्ये सुद्धा एक पाठोपाठ एक वॅक्सीन फेल होत आहेत. अजूनपर्यंत आम्ही लोक अ‍ॅनिमल मॉडलमध्ये वापर करत आहोत, तेथे सुद्धा फेल होत आहे. अ‍ॅनिमलनंतर ह्यूमन मॉडलमध्ये येऊ. वॅक्सीन डेव्हलप करण्याची जी प्रोसेस असते, ती मिनिमम दिड वर्षांची असते. हे देखील तेव्हाच होते, जेव्हा कुठूनही फेल्युअरची समस्या येत नाही. जगात कुठेही कोरोना वॅक्सीन अजूनपर्यंत कोणत्याही मानवावर टेस्ट करण्यात आलेली नाही. जरी टेस्ट केली गेली असली तरी ती अयशस्वी ठरली आहे.

 

डॉ. प्रभात कुमार यांनी म्हटले की, वॅक्सीन बनवल्यानंतर पाहिले जाते की, ती काम करत आहे किंवा नाही. प्रथम ती प्राण्यांवर वापरली जाते. प्राण्यांमध्ये प्रयोग जर यशस्वी झाला तर नंतर मानवी शरीरावर प्रयोग केला जातो. ही वॅक्सीन संक्रमित आणि संक्रमित नसलेल्यांवर वापरली जाते. तीन वेळा वापरली गेल्यानंतर जेव्हा हा प्रयोग यशस्वी होतो तेव्हा ती वापरात आणली जाते. जर एखाद्या स्टेपमध्ये प्रयोग फेल झाला तर पुन्हा पहिल्या स्टेपपासून काम सुरू करावे लागते.

एकुणच कोरोना वॅक्सीनबाबत आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. परंतु, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपसातील सामंजस्याचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे. मागील काही दिवसापूर्वी मिनिस्ट्री ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने स्पष्ट म्हटले होते की, जगभरात 140 वॅक्सीन बनवणार्‍या कंपन्यांपैकी 11 ह्यूमन ट्रायलच्या फेजमध्ये आल्या आहेत. मात्र, यापैकी कोणतीही कंपनी 2021 च्या अगोदर वॅक्सीन बनवण्याची शक्यता नाही.