‘कोरोना’ 2 वर्षात संपुष्टात येईल, WHO च्या प्रमुखांनी दिला 1918 च्या ‘स्पॅनिश फ्लू’चा दाखला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जागतिक आरोग्य संघटनेने अशी आशा व्यक्त केली आहे की कोरोना विषाणू साथीचा आजार 1918 च्या स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी काळ टिकेल. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडॅनॉम घेब्रेयसस शुक्रवारी म्हणाले की, दोन वर्षांत हा साथीचा रोग संपू शकतो. तथापि, यासाठी त्यांनी जगभरातील देशांनी एकरूप होण्यावर आणि सर्वमान्य लस बनण्यात यशस्वी होण्यावर भर दिला. सध्या कोणतीही मंजूर लस उपलब्ध नाही आणि अशात डब्ल्यूएचओ चीफचे हे विधान महत्वाचे आहे. आतापर्यंत डब्ल्यूएचओने साथीचा आजार संपवण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत दिली नव्हती.

1918 च्या स्पॅनिश फ्लूचे निर्मूलन होण्यास दोन वर्षे लागल्याचे ट्रेडोस म्हणाले. जिनिव्हा येथे एका ब्रीफिंग दरम्यान ते म्हणाले, ‘आजच्या परिस्थितीत जास्त तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची बरीच कारणे आहेत. तो वेगाने पसरू शकतो कारण आपण एकमेकांशी अधिक जोडलेले आहोत.’ तसेच ते असेही म्हणाले की सध्यस्थितीला आपल्याकडे यास थांबविण्याचे तंत्र उपलब्ध आहे आणि त्यावर नियंत्रण केले जाऊ शकेल इतपत ज्ञान देखील आहे. अशा परिस्थितीत आपल्याला जागतिकीकरण, जवळीकता, कनेक्टिव्हिटी यामुळे नुकसान तर होत आहे परंतु उत्तम तंत्रज्ञानापासून फायदेही अनेक आहेत. ते म्हणाले की उपलब्ध उपकरणे जास्तीत जास्त वापरुन आपण ही लस देखील तयार करू अशी आशा आहे, त्यामुळे आपण 1918 च्या फ्लूपेक्षा कमी वेळात कोरोना नष्ट करू शकतो.

कोविड -19 साथीच्या आजारामुळे आतापर्यंत सुमारे 8 लाख लोक मरण पावले आहेत आणि जगभरात सुमारे 2.3 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. आधुनिक इतिहासात सर्वात भयंकर साथीचा रोग म्हणजे स्पॅनिश फ्लू होता, ज्यामध्ये 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता आणि जगभरात सुमारे 50 कोटी लोकांना त्याची लागण झाली होती. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत स्पॅनिश फ्लूने 5 पट अधिक लोकांचा बळी घेतला. पहिला पीडित अमेरिकेत आढळला, नंतर तो युरोपमध्ये पसरला आणि त्यानंतर संपूर्ण जगाला त्याचा फटका बसला. हा साथीचा रोग तीन टप्प्यात आला होता. दुसर्‍या टप्प्यातील साथीचा रोग सर्वात घातक होता.