नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला सर्वाधिक पसंती ? शरद पवार की नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ ? सर्व्हेमध्ये खुलासा

पोलीसनामा ऑनलाईनः नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये आता देशात लोकसभा निवडणुका घेतल्यास पुन्हा भाजपचे सरकार बहुमताने सत्तेत येईल, असे समोर आले आहे. यात सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी ठरले आहेत. परंतू मोदींनंतर पंतप्रधान कोण? यावरही लोकांनी एका नावाला पसंती दिली आहे. मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहायचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर किंवा मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान हवेत असे विचारल्यावर लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथांना 10 टक्के लोक तर गृहमंत्री अमित शहांना 8 टक्के लोक पंतप्रधानपदी पाहू इच्छित आहेत. यावरून योगींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या 543 जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 43 टक्के मतांसह 321जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर केवळ भाजपाला 37 टक्के मतांसह 291 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला 27 टक्के मतांसह 93 जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला 19 टक्के जागांसह केवळ 51 जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर अन्य पक्षांना 30 टक्के मतांसह129 जागा मिळण्याची शक्यता आहे. देशात 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 दरम्यान 12,232 जणांदरम्यान सर्वेक्षण केले होते. यापैकी 67 टक्के लोक ग्रामीण तर 33 टक्के लोक शहरी भागातील होती.

सर्व्हेनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 7 टक्के, तर 5 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना 4 टक्के, प्रियंका गांधी यांना 3 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर मायावती, अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2-2 टक्के लोकांनीच पंतप्रधानपदी पसंती दिली आहे.

आजवरचे सर्वाधिक आवडते पंतप्रधान होण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला असून 38 टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. तर 18 टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. 11 टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि 8 टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे.