अहमदनगरच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील बहुसंख्य जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघाचे आघाडी व युतीने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, नगरच्या जागेचा अजूनही तिढा कायम आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. तसेच भाजपात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे प्रचारात व्यस्त असताना, दुसरीकडे खा. दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपचा नेमका उमेदवार कोण असेल, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे, असे सांगितले जाऊ लागले आहे. त्यामुळे नगरच्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यातील लढत निश्चित झाली आहे. मात्र नगरबाबत अजूनही अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आ. अरुण जगताप यांचे नाव मागे पडून त्यांचे पुत्र आ. संग्राम जगताप यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, आ. जगताप यांची उमेदवारी भाजपाची राजकीय खेळी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आ. जगताप यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार की, ऐनवेळी दुसरा उमेदवार देणार याबाबत अजूनही सस्पेंन्स कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील बहुसंख्य जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत फक्त नगर व माढ्याचा तिढा अजूनही कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजून सस्पेन्स असताना भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळेल, असे जवळपास निश्चित मानले जाऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे खा. गांधी यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान केले होते. तसेच देशभरातील जैन समाज हा गांधी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. खा. गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नुकताच भाजप प्रवेश केलेले विखे उमेदवार असतील की विद्यमान खा. गांधी निवडणूक लढवतील, हे अजूनही सांगता येणे कठीण झालेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोघांकडूनही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे नगरची लढत कशी रंगणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.