शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी का निवड केली होती?, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपयेचा हप्ता वसुली करण्याचे टार्गेट दिले होतेे, असा सनसनाटी आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनतर भाजपकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी रविवारी (दि. 21) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुखांवर केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून उद्यापर्यंत निर्णय घेऊ, असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुखांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगायचे झाले तर ठाकरे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या खाद्यांवर गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे- पाटील आदी दिग्गजांची फळी असताना पवार यांनी गृहमंत्रिपद देशमुखांकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. देशमुख हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे आहेत आणि पटेल हे पवारांच्या विश्वासातले आहेत. देशमुख सौम्य स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. सगळ्यांशी त्यांचा नीट संवाद होऊ शकतो, याचा विचार करून त्यांना गृहमंत्रिपद दिल्याचे सांगण्यात येते. दरम्यान देशमुख यांनी आतापर्यंत गृहमंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आदी खात्याची जबाबदारी सांभाळली आहे.