राष्ट्रवादीत प्रवेश का केला ? काँग्रेसच्या ‘त्या’ 18 नगरसेवकांनी सांगितलं कारण

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – महापौर निवडणुकीपासून साथ सोडत काँग्रेसपासून दूर झालेल्या भिवंडी मनपाच्या 18 नगरसेवकांनी बुधवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), यांच्यासह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यानंतर आता शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे तर राष्ट्रवादीची ताकद मात्र वाढली आहे. भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैतागून आपण राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला अशी कबुली या 18 नगरसेवकांनी दिली. गुरुवारी मनपाचे उपमहापौर इम्रान खान (Imran Khan) यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी याचा खुलासा केला.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद दळवी (Javed Dalvi) यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कारकीर्दीत केवळ भाजप व कोणार्कच्या नगरसेवकांना मदत केली मात्र आम्ही काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असूनही आमच्या वार्डात साधं गटार, नाले आणि रस्त्यांची काम देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वार्डातील निधीसाठी मागणी केली तेव्हा तेव्हा आमच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. यामुळं आमच्या प्रभागांमध्ये विकासकामं झाली नाहीत. याचा परिणाम असा झाला की, स्थानिक नागरिकांचा आमच्या वरोधात रोष वाढत होते. त्यामुळं आम्ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला अशी कबुली या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे (Bhagwan Taware) या पत्रकार परिषदेपासून आणि नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या समारंभापासून अलिप्त राहिले. याबाबत विचारले असता नगरसेवकांनी सांगितलं की, भगवान टावरे स्वत: पक्ष श्रेष्ठींना याचं उत्तर देतील. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारूकी (Javed Faruki) हे आमच्या मित्र परिवारातील असून त्यांच्या शब्दाखातरच आम्ही राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला अशी कबुली देखील या 18 नगरसेवकांनी दिली. आमच्या पक्षप्रवेशानं काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. आम्ही राष्ट्रादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन शहर विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिली.

एकही नगरसेवक नसताना तब्बल 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांच्या स्वागत समारंभात आणि पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अलिप्त राहिले. त्यामुळं भविष्यात काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीत देखील शहराध्यक्षपदाचा खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 10 दिवसात जावेद फारूकी शहराध्यक्ष होतील अशी घोषणा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत दिल्यानं राष्ट्रवादीत देखील भविष्यात दोन गट पडतात की काय अशी शंका निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.