पानशेत धरण का फुटले?

पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहराच्या इतिहासात अतिशय महत्वाची घटना म्हणजे पानशेत धरण फुटी. आज या घटनेला ५७ वर्षे पूर्ण होत आहे. पानशेत धरण फुटीनंतर पुणे विस्तारले. नव्या पुण्याच्या आकार, विकाराला महत्वाचे ठरले ते पानशेत धरणफुटी.

पुणे : १२ जुलै १९६१ या दिवशी सकाळी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.

पार्श्वभूमी

इ.स. १९५० च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून १३ कि.मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषत: उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्चिमेस पुण्यापासून ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० आॅक्टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c48c088e-858b-11e8-9c11-6790e45aed5e’]

पहिल्या टप्प्यात ६ टीएमसी, तर दुसऱ्या टप्प्यात ११ टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून १९६२पर्यंत बांधून पुर्ण होणार होते.  १९५९-१९६०च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला.

बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बर्हिद्वार योजण्यात आले होते. बर्हिद्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोºयावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल, अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी १९६१च्या जूनअखेरीसदेखील पूर्ण झाल्या नव्ह्त्या. बर्हिद्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चा राहिला होता. बर्हिद्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूरपातळीनुसार हा दरवाजा वर-खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता.

एका बाजूची माती कच्ची असल्याने तिच्यातून गळती सुरु झाली. दुसरीकडे पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. गंभीर परिस्थिती पाहून लष्कराची मदत घेण्यात आली. त्यांनी माती, डबरची पोती टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्याचा लोंढाच इतका जबरदस्त होता की शेवटी १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटले. आणि धरणातील पाणी वेगाने पुण्याच्या दिशेने येऊ लागले. प्रचंड वेळेने येणारे पाणी खडकवासला धरणात येणार असल्याने त्यालाही धोका होता. तेव्हा त्यात स्फोट करुन मधला भाग उडविण्यात आला. धरण फुटल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने प्रशासनाने काळजी घेऊन नदीच्या परिसरातील सर्व रस्ते बंद केल्याने पूरात जिवित हानी झाली नाही. पण मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.

पानशेत धरणात शकडो घरांचे नुकसान झाले. त्यांच्यासाठी गोखलेनगर, पर्वती, राजेंद्रनगर, महर्षीनगर येथे तातडीने घरे बांधण्यात आली. पण, अजूनही या पूरग्रस्तांच्या नावावर ही घरे झाली नसल्याने त्यांचा प्रश्न कायम आहे.

अफवाचा बाजार

आता व्हट्सअपवरुन काही क्षणात अफवा पसरतात, तेव्हा व्हट्सअप नव्हते तरी अफवा पसरण्याच्या त्या पसरत होत्याच. धरण फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी ओसल्यावर आपले वाचलेले साहित्य शोधण्याचा प्रयत्न नदीकाठचे लोक करीत होते. त्याच वेळी पुन्हा पुर येणार अशी अफवा पसरली. लोकांनी आताला मिळेल ते घेऊन धूम ठोकली. त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी लोकांच्या सामानावर डल्ल्ला मारला. अशाही कथा सांगितल्या जात होत्या.