पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाहीत ? शिवसेना नेत्यानं केलं ‘हे’ मोठे विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचे नाव आल्यानंतर आघाडी सरकारमधील नेत्यांनी सावध भूमिका घेत प्रतिक्रिया देत आहेत. मात्र आता शिवसेनेच्या एका मंत्र्यांने पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्या बाबतीत महत्त्वाचे विधान केले आहे.

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीचा महंमदवाडी परिसरातील एका सोसायटीच्या इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या आहे की हत्या अशी शंका घेतली जात आहे. यानंतर पोलिसांना पूजाचे कॉल रेकॉर्डिंग मिळाले. यावरुन पूजाने आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तसेच पोलिसांवर दबाव टाकला जात असून पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने करत नसल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अद्याप प्रसार माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे आसा प्रश्न विचारला जात आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठे भाष्य केले आहे. ते आज पुणे दौऱ्यावर आले होते. सामंत म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणी राठोड समोर का येत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण याबाबत तपास सुरु आहे. अहवाल सादर केलेला आहे अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले आहेत. यामुळे मी आणखी काही बोलणे योग्य नाही. असे म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणे टाळले.