केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘100 कोटी वसुलीप्रकरणी ठाकरे, पवार गप्प का?’

पोलीसनामा ऑनलाइन – अंबानीच्या घराजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी थेट बोलणे टाळणाऱ्या केंद्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीवरून मोठे विधान केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पुन्हा पोलीस दलात घेतले, मुख्यमंत्री ठाकरेंच्या की शरद पवारांच्या असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. तसेच फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही, तर हे ऑपरेशन लुटालूट आहे. हा वसुलीचा गुन्हा असून यात पवारांना सत्तेचा हिस्सा नसताना माहिती पुरविली जात आहे. ते सत्तेचा भाग नसताना त्यांना कोणत्या आधारे माहिती पुरविली जात आहे. दुसरी बाब म्हणजे पवारांनी यावर काय कारवाई केली, गुन्हा रोखण्यासाठी त्यांनी काय चौकशी केली, असा सवाल प्रसाद यांनी केला. गृहमंत्री देशमुख कोणासाठी वसुली करत होते, आपल्यासाठी, राष्ट्रवादीसाठी की मुख्यमंत्री ठाकरेंसाठी हे देखील शोधणे गरजेचे असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.

 

 

 

प्रसाद यांनी रविवारी (दि. 21) पत्रकार परीषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र आहात. राज्यात तुम्ही बेईमानीचे सरकार स्थापन केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री वाझेची बाजू घेतात आणि त्यांचाच गृहमंत्री वाझेला मला 100 कोटीचे हप्ता वसूलीेचे टार्गेट देतो ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची ईमानदारीने चौकशी व्हावी. यासाठी महाराष्ट्र भाजपा रस्त्यावर उतरणार असल्याचे प्रसाद म्हणाले. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी झाली पाहिजे. कारण यात शरद पवार यांची भूमिका आणि मुंबई पोलिसांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. वाझेला वाचविण्यासारखी अशी काय परिस्थिती आली होती. निलंबित पोलीस अधिका-याला शिवसेनेत आणले जाते त्यानंतर त्याला पोलीस सेवेत घेतले जाते हे संशयास्पद असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.