बदलीसाठी दिलेल्या १ कोटीच्या वसुलीसाठी ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलीने ज्यांच्यामार्फत पैसे दिले होते, त्या वकील महिलेच्या घरात घुसुन धुडगुस घातला. पोलिसांकडे आलेल्या गोपनीय चौकशीतून ही बाब पुढे आली आहे.

ताराबाई पार्क येथे राहणाऱ्या या वकील महिलेने, घरावर हल्ला करीत साहित्याची तोडफोड व धक्काबुक्की केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलीच्या विरोधात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबतची माहिती अशी, महसूल विभागातील या वरिष्ठाची वकील महिलेशी २००९ पासून ओळख आहे. त्या महिलेचेही अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध आहेत. या अधिकाऱ्याला सोईच्या ठिकाणी बदली हवी होती. त्यासाठी त्याने वकील महिलेच्या मदतीने गगनबावडा तालुक्यातील ‘पाटील’ नावाच्या माजी सरपंचाची भेट घेतली. पाटील याने आपण अधिकाऱ्याची हवी तिथे बदली करून देतो असे सांगितले. त्याची मंत्र्यांसोबत ऊठबस असल्याने अधिकाऱ्याचाही विश्वास बसला.

वकील महिलेच्या ओळखीतून या माजी सरपंचाने बदलीसाठी मांडवली करण्यासाठी एक कोटी रुपये घेतले. पैसे देऊनही बदली झाली नाही; त्यामुळे अधिकाऱ्याच्या पत्नीने वकील महिलेकडे पैशांची मागणी केली. तिने आपल्या ओळखीने ‘माजी सरपंच पाटील’ याने पैसे घेतले आहेत, त्याच्याकडून घ्या, असे सांगितले. परंतु ‘आम्ही पैसे तुमच्या विश्वासावर दिले आहेत. ते तुम्हीच दिले पाहिजेत,’ असे म्हणून गेली आठ वर्षे अधिकाऱ्याची पत्नी पैशांची मागणी करीत होती. माजी सरपंच पाटील यानेही पैसे पुढे दिल्याचे सांगून टाळाटाळ केली होती. संबंधित महसूल अधिकारी पैशाचे नाव काढत नव्हता. त्यांच्या पत्नीला हे खटकत होते.

संतापलेल्या पत्नी व मुलीने अखेर वकील महिलेच्या घरात घुसून धुडगूस घातला. या महिला वकिलांनी पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्याची चौकशी शाहूपूरी पोलिसांना करण्यास सांगण्यात आले आहे. महिला वकिल व सरपंच हे आता कानावर हात ठेवत आहेत. या प्रकरणातून महसूल अधिकारी अडचणीत येणार असल्याने त्यावर पडदा टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत.