दुर्देवी ! पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीची चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या, महाराष्ट्रातील घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच, पत्नीनेही अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. लोहा शहरात ही घटना घडली आहे. दाम्पत्याच्या मृत्यूनंतर मात्र, त्यांच्या दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पद्मा शंकर गंदम असे चिमुकल्यासह आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुासर, मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या काही वर्षापासून व्यवसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह वास्तव्यास होते. दरम्यान काही दिवसापूर्वी शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला. शंकर यांच्या मृत्यूची माहिती पत्नी पद्मा गंदम यांना समजली. त्यांना पतीच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही. त्यांनी 3 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.