अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्नीचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या रागातून पतीने प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात ही दुर्दैवी घटना घडली.

कल्पना विश्वनाथ गायकवाड हे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विश्वनाथ रंगनाथ गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर, हल्ली रा. लोणी खुर्द, ता. राहता) व व पतीच्या प्रेससीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दामू नामदेव भालेराव (रा. काकडी, ता. कोपरगाव) यांची मुलगी कल्पना हीचे विश्वनाथ गायकवाड याच्यासोबत लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार सुखाचा झाला. मात्र, काही दिवसांनंतर कौटुंबिक कुरबुरी सुरू झाल्या. विश्वनाथ याचे नात्यातीलच एका महिलेसोबत सूत जुळले. त्यातून विश्वनाथ व त्याची पत्नी कल्पना यांच्यात वादविवाद सुरू झाला. तिने पतीच्या अनैतिक संबंधास विरोध करून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती विश्वनाथ हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे सदर महिलेसोबत अनैतिक संबंध सुरूच राहिले. त्यातून पती-पत्नीतील बेबनाव वाढला.
पती विश्वनाथ याने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीच्या खुनाचा कट रचला. लोणी खुर्द येथील राहत्या घरी गळा आवळून कल्पना यांचा खून केला. 19 डिसेंबर रोजी कल्पना यांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. सुरुवातीला लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. कल्पना हिचे वडील दामू भालेराव यांच्या फिर्यादीवरून लोणी खुर्द पोलीस ठाण्यात पती व त्याच्या प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.