एटीएम पीन च्या बहाण्याने घातला ६२ हजारांचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन एटीएम कार्डकरिता पिन नंबर तयार करण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका नागरिकाकडून तब्बल ६२ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत अन्वर शेख यांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून ,या प्रकरणाबाबत गोवंडी पोलिसांनी अजयकुमार राजभर आणि अब्दुल्ला शेख यांना अटक केली आहे. दरम्यान अशाप्रकारची फसवणूक करणारी टोळीच कार्यरत असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चालक व्यवसाय करणारे अन्वर जियाउद्दीन शेख यांनी बँक ऑफ बडोदा चे नवे एटीएम घेतले होते. २७ जानेवारीला अन्वर हा गोवंडी पूर्वेकडील जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये नवीन पिन नंबर तयार करण्यासाठी गेला. याचदरम्यान अजयकुमार आणि अब्दुल्ला हे दोघे त्या एटीम सेंटर च्या आसपास घुटमळत होते. त्यानंतर अन्वर पैसे काढण्यासाठी गेले असता. नवा पिना नंबर आम्ही तुम्हाला मिळवून देतो असे सांगत ते दोघे देखील एटीएम सेंटर मध्ये गेले. त्यानंतर त्यांनी अन्वरचे कार्ड स्वत: घेतले. या कार्डप्रमाणे हुबेहूब दिसणारे दुसरे कार्ड त्याला दिले. अन्वरकडून घेतलेल्या कार्डद्वारे पिन नंबर तयार करून या दोघांनी ६२ हजार रुपये काढले.

त्यानंतर, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्वरने गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून अजयकुमार आणि अब्दुल्ला यांना शोधून काढले. त्यांचा आणखी किती गुन्ह्यांत सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

एटीएम बाबत काय घ्यावी दक्षता

— तुमचा एटीएम पिन नंबर कुणालाही सांगू नका

–तुमच्या खात्याशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडा जेणेकरून तुम्हाला पैसे काढले आणि खात्यावर आले तर संदेश मिळेल

–एटीएम मधून पैसे काढल्यानंतर Cancel /EXIT बटन दाबायला विसरू नका .

–तुम्ही एटीएम मधून पैसे काढताना कुणी तुमच्यावर हेरगिरी तर करीत नाही ना याची काळजी घ्या.

–तुमचे एटीएम कार्ड हरवल्यास ताबडतोब तुमचे खाते बँकेकडून Freeze करून घ्या. याबाबात बँकेत सूचना द्या