बेपत्ता पतीचा शोध लावून देणाऱ्या फकीर बाबाने महिलेला लुटले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अचानक बेपत्ता झालेल्या पतीचा शोध घेण्यासाठी तिने एका फकीर बाबाची मदत घेतली. पण या बाबानेच महिलेकडील दागिने लुटून नेल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. पवई परिसरात ही महिला, पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने या महिलेला तिच्या चिंतेचे कारण विचारले.

तिने पती बेपत्ता झाल्याचे सांगताच, फकिराने त्यांच्या हाताला चुना लावला. त्यावर पाणी ओतताच पाणी गुलाबी झाले. पुढे त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला. तेव्हा, फकिराने पती एका महिलेच्या नादी लागल्याचे सांगून उद्या येऊन उपाय सांगतो, असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे १६ तारखेला सकाळी बाबा या महिलेच्या घरी आला. बाबाने त्याच्याकडील चार खिळे दिले व घराच्या चार कोपऱ्यात पेपरमध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच पतीला सोन्याचे पाणी पाजल्यानंतर तो व्यवस्थित होईल आणि पुढे कधीच घर सोडून जाणार नाही, असे सांगितले. त्यानुसार, महिलेने अंगावरील दागिने काढून बाबाकडे दिले. त्याने मडक्यात ते दागिने टाकले. त्यात पीठ टाकून, मडके कपड्याने गुंडाळून सायंकाळी उघडण्यास सांगितले. त्याआधी उघडल्यास पती आणि मुलगा मरण पावतील अशी भीती घालून बाबा निघून गेला. ती महिला सायंकाळ कधी होतेय याची वाट पहात बसली. सायंकाळी ५ नंतर तिने मडके उघडून बघितले असता, त्यात दागिने सापडले नाहीत.

संसारापेक्षा सन्यास बरा… बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी काढली संन्यासी दिंडी

महिलेने परिसरात बाबाचा शोध सुरू केला. तेव्हा, १७ तारखेला एका कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये बाबा कैद झालेला दिसला. तिने हे फूटेज घेऊन रविवारी पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फूटेजच्या आधारे ते फकीर बाबाचा शोध घेत आहेत.