Baramati News : विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –  सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती शहरातील रुई भागात बुधवारी (दि. 24) ही घटना घडली. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू व जाऊबाईविरोधात तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सई उन्मेघ गायकवाड (वय 26) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती उन्मेघ किशोर गायकवाड, सासू शोभा किशोर गायकवाड व जाऊ तनुजा तृणाल गायकवाड (रा. दुर्वांकुर अपार्टमेंट, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत सई हिची आई वंदना संजय बोंद्रे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्मेघ व सई यांचे लग्न 2014 मध्ये झाले होते. सई सासरी नांदताना पतीकडून तिला सतत भांडण काढून शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार मारहाण केली जात होती. दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. तेंव्हा बारामती व फलटणमधील तक्रार निवारण केंद्रात सईने तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार दोन्ही बाजूंना समजावून सांगण्यात आल्यावर ती पुन्हा नांदायला आली होती. त्यांना एक मुलगाही आहे. दरम्यान पती उन्मेघ तिला दारु पिवून मारहाण करणे, चारित्र्यावर संशय घेणे सुरुच ठेवले. हे दोघे रुई येथे भाडोत्री घरामध्ये राहू लागले. तरीही पतीकडून होणारा त्रास सुरुच राहिला. अखेरीस सततच्या छळाला कंटाळून सईने बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.