महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटी लावताना त्रास दिला जात असल्यामुळे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तालुका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ८ वाजता घडला. या महिलेने त्याअगोदर पोलीस अधीक्षकांच्या नावाने एक चिढ्ढी लिहिली असून त्यात पोलीस निरीक्षकांसह त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. श्रध्दा अर्जुन आहेर ( वय ३१, रा.दक्षता पोलीस लाईन,जळगाव) असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, श्रध्दा यांच्या कुटुंबातील एक जण आजारी असल्याने गैरसोयीची ड्युटी लावू नका म्हणून त्यांनी हजेरी मास्तर व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना विनंती केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे घर, हॉस्पिटलला जाणे येणे त्यावरच सांगूनही गैरसोयीची ड्युटी लावण्याच्या प्रकारामुळे त्या तणावाखाली होत्या. श्रध्दा यांनी ड्युटी संपण्याच्या आधीच झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यांना काही वेळाने अस्वस्थ वाटू लागले. पतीला त्यांनी बोलावून घेतले. प्रकृती खालावल्यामुळे पोलीस वाहनातून त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर आणखी प्रकृती बिघडल्याने त्यांना रात्री साडेअकरा वाजता जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना सोयीची ड्युटी लावली जाते व इतर कर्मचाऱ्यांना गैरसोयीची ड्युटी लावली जाते असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले असून त्याच निरीक्षक दिलीप भागवत, हजेरी मास्तर अमीर तडवी, उमेश भांडारकर, महिला कर्मचारी दुसाने व धनके यांचेही नावे चिठ्ठीत आहेत. माझ्या मरणाला हेच चार जण जबाबदार आहेत, असे त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.