‘ऑनलाईन’ घटस्फोटित वर शोधायला गेलेल्या शिक्षिकेला 4.40 लाखांला फसवलं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – घटस्फोटित असलेल्या एका शिक्षिकेला ऑनलाइन वर शोधणे चांगलेच महागात पडले. यात तिला भामट्यांनी भेटवस्तू पाठविल्याची थाप मारत तिच्याकडून सुमारे 4 लाख 40 हजारांची रक्कम ऑनलाईन उकळून फसवणूक केलीय. या गुन्ह्याची नोंद सोलापुरामध्ये जेलरोड पोलीस ठाण्यात झालीय.

संबंधित महिला पेशाने शिक्षिका असून घटस्फोटित आहे. त्यामुळे त्यांनी पुढील आयुष्यासाठी दुसरा जोडीदार निवडण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी मागील 21 नोव्हेंबर रोजी स्वतःच्या स्मार्ट फोनवर घटस्फोटित वधू-वर स्थळ सूचक मंडळाच्या एका अ‍ॅपवर स्वतःची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांना मोबाइलवर एका व्यक्तीने संपर्क साधला. तसेच घटस्फोटित वधू-वरांविषयी माहिती पुरविली.

त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधला आणि आपण भेटवस्तू पाठविली आहे, असे सांगितले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांना अनोळखी क्रमांकाने मोबाइल फोन आला. तसेच पलिकडील व्यक्तीने स्वतःचे नाव प्रिया शर्मा असल्याचे सांगितले.

तसेच आपण दिल्लीच्या आबकारी कर विभागातून बोलत आहे, असे नमूद करीत, तुमच्या नावाने भेटवस्तू आली आहे. त्यावर 35 हजारांचा कर भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तेवढी रक्कम दिलेल्या सूचनेनुसार देवाशिश जेना या व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला.

तसेच पलिकडील व्यक्तीने, भेटवस्तू स्कॅन करून पाहिली असता त्यात परकीय चलन आणि सोने आहे, असे सांगत त्यापोटी दंड भरण्यास सांगितले. दंड न भरल्यास कारवाई होईल, अशी भीतीही दाखविली. त्यामुळे दंड म्हणून 1 लाख 80 हजारांची रक्कम त्यांनी पाठवली. परंतु त्यानंतर मागणी केल्याने पुन्हा 2 लाख 25 हजार रूपये पाठविले आहे. परंतु भेटवस्तू येत नसल्याने त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला.

तेव्हा त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी केली. त्यामुळे शेवटी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद हे पुढील तपास करताहेत.