उर्मिला मातोंडकर बद्दल फेसबुक पोस्ट प्रकरणात महिला आयोगाने मागविला पुणे पोलिसांकडुन अहवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बद्दल फेसबुकवर अतिशय अश्लील भाषेत पोस्ट लिहिणा-या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. या प्रकाराने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणातील कार्य़वाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.

धनंजय व्यंकटेश कुडतरकर (वय ५७, रा. बुधवार पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी अत्यंत अश्लिल, अनुचित अशी भाषा वापरली आहे. स्त्रीचा आनादर करण्याचा हेतू यामागे आहे. ही बाब स्त्रियांसाठी लज्जास्पद असल्याचे महारष्ट्र महिला आयोगाने म्हटले आहे.

महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. तसेच चौकशी केलेल्या कार्य़वाहीचा अहवाल आयोगाला तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण

धनंजय कुडतरकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक खात्यावर अतिशय अश्लील भाषेत पोस्ट केली आहे. त्याने अभिनेत्री उर्मिलाबद्दल अश्लील भाषेत पोस्ट लिहिल्याने खळबळ उडाली. पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी थेट त्याच्या घरावर मोर्चा काढला. त्यानंतर धनंजय कुडतरकर याने पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षण घेतले. महिला आक्रमक झाल्या असून याप्रकरणी तक्रार केली आहे. तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यानंतर अखेर त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात वियनभंग आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलनुसार तो भाजपचा कट्टर समर्थक असल्याचे दिसते. त्याने शरद पवार, सोनिया गांधी आणि इतरांबद्दलही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. परंतु त्याने उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल अश्लील भाषेत पोस्ट लिहिल्यानंतर खळबळ उडाली आहे.