जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुपरमॉम ‘मेरी कोम’ ची बाजी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा ५ विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.

पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोटोला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फेरीदरम्यान ओखोटोने मेरीला खालीही पाडलं, मात्र यामधून सावरत मेरीने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. तिसऱ्या सत्रामध्ये ओखोटोने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरी कोमला चांगलचं जेरीस आणलं. मात्र मेरीने सामन्यावरचं आपलं नियंत्रण कायम ठेवलं. अखेरीस पंचांनी एकमताने मेरीला सामन्यात विजेता घोषित केलं.

जागतिक स्पर्धेत मेरी कोमची सुवर्ण कामगिरी

  • २००१ (पेंसिल्वेनिया): रौप्य
  • २००२ (तुर्की): सुवर्ण
  • २००५ (रशिया): सुवर्ण
  • २००६ (दिल्ली): सुवर्ण
  • २००८ (चीन): सुवर्ण
  • २०१० (बार्बाडोस): सुवर्ण
  • २०१८ (दिल्ली): सुवर्ण