‘थकवा’ हा देखील एक आजार : WHO

पोलीसनामा ऑनलाईन टीम – थकवा येणे हा एक प्रकारचा आजार आहे हे आता ‘जागतिक आरोग्य संघटने’ नेही मान्य केले आहे. मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशी थकव्याची वर्गवारी करता येईल. कामात बराच काळ तणाव असल्यास थकवा जाणवतो. यामुळे भावनिक थकवा येतो. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कामाच्या ठिकाणावरचा स्ट्रेस व्यवस्थित मॅनेज झाला नाही तर हा थकवा येतो. त्यास ‘बर्न आऊट’ म्हटले जाते.

काम कोणतेही असले तरी कामाच्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात तणाव जाणवतोच. नेहमीचेच असल्याने कर्मचाऱ्यांनाही या तणावाची सवय होऊन गेलेली असते. परंतु, खराब व्यवस्थापनामुळे हा तणाव खुपच वाढतो. तो एवढा वाढतो की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. अशी स्थिती कायम राहिल्यास एखाद्या व्यक्तीस अन्य मानसिक आजारही होऊ शकतात. अशा प्रकारचा टोकाचा तणाव टाळायचा असेल नोकरीच्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आरोग्यपूर्ण वातावरण राहील.

क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यास सांगणे, मर्यादित नियंत्रण, कामाचे कौतुक न करणे, एखाद्याला जाणीवपूर्वक अयोग्य काम देणे, नीतिमत्तेला अनुसरून नसलेले काम करावे लागणे आणि कामाच्या ठिकाणी एकजूट नसणे या ६ गोष्टी कामाच्या ठिकाणी धोकायदायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या सहा गोष्टींमुळे हा बर्न आऊट होतो. बर्न आउट किंवा थकवा ओळखण्याची काही लक्षणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने एनर्जी कमी होते, कामापासून दूर जावेसे वाटते, स्वत:च्या कामाबद्दल नकारात्मक भावना येतात. तुमची कार्यक्षमता कमी होते. अशी लक्षणे आपल्या सहकाऱ्यांमध्ये दिसत असतील, तर त्यांना यामधून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे. शिवाय ऑफिसने अशा व्यक्तींना सिक लीव्ह दिली पाहिजे. अशा व्यक्तीने मानसोपचार तज्ज्ञांकडे जावून उपचार घ्यावेत.