जागतिक चिमणी दिवस विशेष : पोलीस कर्मचाऱ्याने जपला अनोखा छंद !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – चिव…चिव…चिव…चिव… असा गलका केलेला आवाज आपल्या कानी पडला तर समजायचे की, चिमण्यांची शाळा आजूबाजूला कोठेतरी भरलेली असणार. परंतु हा आवाज काहीसा दुर्मिळ झाल्याची बोंब आजकाल सगळीकडे उठलेली दिसते. खेड्याच्या तुलनेत शहरांतील चिमण्या किंवा इतर पक्षी झपाट्याने कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या विकासामुळे पक्ष्यांची संख्या कमी होऊन पर्यावरणीय संकट समोर उभे राहिले असल्याने विविध प्रसंगी दिन साजरे करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, त्यातच आज 20 मार्च हा सर्वत्र “जागतिक चिमणी दिवस” म्हणून साजरा केला जातोय त्यानिमित्ताने त्याबाबत अधिकचे हे विचारमंथन.

चिमणीसह इतरही शहरी किंवा मानवी वस्तीत आढळणारे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याबाबत संवर्धन करण्यासाठी एक पाऊल म्हणून भारतातील ‘नेचर फॉरेव्हर’ संस्था आणि फ्रान्समधील इको ‘सिस ऍक्शन फौंडेशन’ यांनी जगातील इतरही ‘निसर्ग संवर्धन’ संस्था यांच्या मदतीने पुढाकार घेऊन जागतिक चिमणी दिवस ही चळवळ जागतिक स्तरावर निर्माण करून सुरुवातीला 20 मार्च 2010 रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

जागतिक चिमणी दिन साजरा करण्याचे उद्देश –

शहर व गावातील पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे चिमणी व इतर पक्षी यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना, पर्यावरणवादी सामाजिक संघटना, गाव पातळीवर शासकीय संस्था इत्यादींच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून संवर्धनाचे कार्य पुढे नेणे. स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांवर अभ्यास करून त्यावर भर देणे,

निसर्ग व वन्यजीव संवर्धन व संरक्षण बाबत कार्य करणाऱ्या संस्था, संघटना, कार्यकर्ते यांना एकत्रित करून कृती आराखडा तयार करणे व त्यांना सतत प्रोत्साहन देणे. नष्ट होत चाललेले, दुर्मिळ असलेले, दुर्मिळ होत चाललेले पक्षी याबाबत कृतिशील उपाययोजना तयार करणे. चिमणी व पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पाणी पिण्यासाठी पाणवठे किंवा पाण्याचे मटके लावून त्यात पाणी टाकावे कारण उन्हाळ्यात पक्ष्यांचे दुर्भिक्ष्य असते.

चिमणी पक्ष्याची माणसाशी जुन्या काळापासून भावनिक जवळीकता निर्माण झालेली आहे त्यामुळे पक्षी किती व कसे आणि कोणते आहेत यावरून आपल्या परिसरातील पर्यावरणीय परिसंस्था चांगली की धोकादायक आहे हे समजून येते व त्यावर अभ्यास करून उपाययोजना ठरवता येतात हे एक त्याचे फलित म्हणावे लागेल.

वरील उद्देश लक्षात घेता या पोलीस कर्मचारी यांनी आपला छंद जोपासला. या अवलिया पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे धनंजय गुट्टे (वन्यजीवप्रेमी तथा महाराष्ट्र पोलीस, लातूर). आपले कर्तव्य पार पाडत फोटोग्राफी चा छंद त्यांनी जोपासला. कानावर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला की त्यांची एक एक हरकत कॅमेऱ्यात कैद करण्याचा मानस त्यांचा असतो. त्यानी आजपर्यंत शेकडो चिमन्यांच्या हरकती आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आज जागतिक चिमणी दिना निमित्याने त्यांनी त्या सार्वजनिक केल्यात..