कझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे स्थान कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुस्तीपटू सुशील कुमार याने कझाकिस्तान येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले आहे. के. डी. जाधव कुस्ती स्टेडियमवर आज (ता.२०) पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटातील चाचणीत जितेंद्रचा ४-२ ने पराभव करुन भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. चाचण्यांमध्ये सुशीलला सामन्याच्या पहिल्या फेरीत ४-० अशी आघाडी होती.

सुशीलसमवेत राहुल आवारे, किरण मोर आणि प्रवीण यांनी विविध वजनी गटात जागतिक आजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान कायम केले आहे. जितेंद्रने शुक्रवारी (ता. २३) होणाऱ्या चाचणीमध्ये ७९ किलो वजनी गटात वीरदेव गुलियाचा पराभव केल्यास जितेंद्रचे नावही या यादीत सामील होण्याची शक्यता आहे.

२०१० मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेला सुशील कुमार आता रवी दहिया, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मौसम खत्री आणि सुमित मलिक यांच्यासोबत भारतीय संघात सामील झाला आहे. कझाकिस्तानात १४ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत ही जागतिक कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे

आरोग्यविषयक वृत्त