‘या’ लेखिकेने पद्मश्री पुरस्कार नाकारला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता या ख्यातनाम लेखिका आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. परंतु गीत मेहता यांनी भारत सरकारने दिलेला पुरस्कार नाकारला आहे. भारत सरकारने मला हा सन्मान दिला, यासाठी मी त्यांची आभारी आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा किताब मी स्वीकारणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

गीता मेहता यांना भारत सरकारने साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारत सरकारने भारतरत्न, पद्मभुषण, पद्मविभूषण हे पुरस्कार जाहीर केले. मेहता सध्या परदेशात राहतात. भारत सरकारने दिलेला हा किताब गीता मेहता यांनी नाकारला. त्यांनी न्यूयॉर्कमधून केंद्र सरकार आणि माध्यमांना निवेदन पाठवून किताब स्वीकारण्यास नकार दिला आहे.

भारत सरकारने मला हा किताब दिला आणि यासाठी मी त्यांची आभारी आहे. पण हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना हा पुरस्कार दिल्याने गैरअर्थ निघू शकतात. हे भारत सरकार आणि माझ्यासाठी भूषणावह ठरणार नाही आणि म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, गृहमंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात मेहता यांना परदेशी नागरिक म्हटले आहे. मात्र मेहता यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्यामुळे त्या अजूनही भारतीय नागरिक आहेत, असं सूत्रांनी सांगितले. मेहता यांनी कर्म कोला, राज, अ रिव्हर सूत्र, इटर्नल गणेशा- फ्रॉम बर्थ टू रिबर्थ अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यासोबतच त्यांनी १४ हून अधिक माहितीपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.