यशोमती ठाकूर यांनी घेतली स्मृती इराणी यांची दिल्लीत भेट, जाणून घ्या कोणत्या विषयावर झाली चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या (Congress) नेत्या आणि महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिल्लीत भाजपच्या (BJP) नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची आज (शुक्रवारी) भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या 2020-21 मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषक कार्यक्रमासाठी 2003 कोटी रुपयांच्या सुधारीत आराखड्यास मान्यता देण्याचे निवेदन दिले.

स्मृती इराणी यांची भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्री, राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त इंद्रा मालो, महिला बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद उपस्थित होते.

स्मृती इराणी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्रात आम्ही काही समस्यांना तोंड देत आहोत. अनेक विषयांवर स्मृती इराणी यांच्यासोबत सविस्तर बोलणं झालं. या बैठकीतून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी आशा आहे. लहान मुलांसोबत आणि स्तनदा माता किंवा मग गर्भवती मतांसोबत आपण राजकारण नाही करु शकत. त्यामुळे महाराष्ट्राचे जे अडकलेले पैसे आहेत. ते नक्की राज्याला मिळतील अशी आशा आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.