Coronavirus : UP मध्ये कामगारांना सॅनिटायझरनं घातली अंघोळ, CM योगींवर भडकले ‘प्रियंका-अखिलेश-मायवती’

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बरेली येथील परप्रांतीय मजूरांना सॅनिटायझरने अंघोळ घालण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या हाच मुद्दा अनेक राजकीय नेत्यांकडून उचलून धरला जात आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या प्रकाराबद्दल प्रशासनाची निंदा केली आहे. या तीन नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. बसपा अध्यक्षा मायावती यांनी म्हटले की, देशात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांवर अत्याचार करण्यात येत असल्याची छायाचित्र प्रसारमाध्यमातून पहायला मिळत आहे. मात्र उत्तर प्रदेशातील बरेली येथे परप्रांतीय मजूरांवर किटक नाशक फवारणे आणि त्यांना शिक्षा करणे हे मानवतेच्या दृष्टी योग्य नाही. याची जेवढी निंदा करू तेवढी कमी आहे. याकडे सरकारने गांभीर्यान पाहिले पाहिजे.

त्याचवेळी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील याची निंदा करुन काही प्रश्न उपस्थित केले आहे. मजूरांवर रासायनीक औषधाची फवारणी करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्या सूचना आहेत का ? रासायनिक फवारणीमुळे शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामावर काय उपाय आहेत ? भिजलेल्या लोकांना कपडे बदलण्यासाठी कोणती व्यवस्था आहे ? तसेच भिजलेल्या खाद्य पदार्थांसाठी कोणती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे ?

मायावती आणि अखिलेश यादव यांच्यानंतर काँग्रेसच्य सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला विनंती केली आहे. प्रियांका गांधी यांनी यूपी सरकारला विनंती केली आहे की आपण सर्व जण या आपत्तीविरुद्ध लढत आहोत. पण कृपया अशा प्रकारचे अमानुष कृत्य करू नका. कामगारांना आधीच खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच केमिकलने त्यांना आंघोळ घालणे चुकीचे आहे. यातून त्यांचे संरक्षण होणार नाही मात्र त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.