Pimpri News : ‘उद्योगनगरीतील गुन्हेगारी मोडीत काढा, तुम्हाला कोणाचा फोन येतो ते बघतोच’, उपमुख्यमंत्री पवारांचे पोलीस आयुक्तांना आदेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात औद्योगिकीकरण, नागरिकरण होताना दुचाकी जाळणे, वाहनांच्या काचा फोडणे, महिला, तरुणी, सामान्य नागरिक,व्यापा-यांना त्रास देणे अशा गुन्ह्यात वाढ झाली आहे. मात्र हे आता कमी नाही तर बंद झाले पाहिजे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, त्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही किंवा कोणीही तुम्हाला फोन करणार नाही. जर कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतोच त्याच्याकडे अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या संकल्पनेनुसार शहर पोलीस दलासाठी हेल्थ 365 हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील 3 हजारांवर पोलिसांना स्मार्ट वाॅचचे वाटप करण्यात आले. चिंचवड येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच यावेळी पोलिसांना सायकल व ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शहरात गुन्हेगारीतून पैसे मिळवून काहिंनी प्रस्थ वाढविले आहे. त्यांना ताळ्यावर आणायचे आहे. कायद्याच्या व नियमांच्या अधीन राहून पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई करावी. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती करताना घाईगडबड झाली. पुरेशी साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोलीस आयुक्तालयासाठी जागा, साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे ते म्हणाले.

पोलिसांसाठीचा राज्यातील पहिलाच स्मार्ट उपक्रम
स्मार्ट वाॅचमुळे आरोग्याची निगा राखण्याबाबत पोलिसांना मदत होणार आहे. राज्यातील पोलिसांसाठीचा हा पहिलाच स्मार्ट उपक्रम आहे. यामुळे पोलिसांचे जिवनही स्मार्ट होईल. यातून पोलीस दलाचे आरोग्य निश्चत सुधारेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

रात्रगस्तीसाठी सायकल, ग्रामसुरक्षा दल
रात्रगस्तीसाठी पोलिसांना सायकलचे वाटप करण्यात आले. एका पोलीस ठाण्याला 30 अशा प्रकारे 18 पोलीस ठाण्यांना 540 सायकल देण्यात आल्या. तसेच रात्र गस्तीसाठी ग्राम सुरक्षा दल नियुक्त केले असून त्याच्या सदस्यांनाही ओळखपत्र प्रदान केले आहे.

महापाैर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे या वेळी उपस्थित होते.