Jalgaon News : नवीन विद्युत लाईनचं काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  नवीन विद्युत लाईनचं काम करत असताना पोलचे ट्रॅक्टर पलटी होऊन उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल नकुल गायकवाड (वय 18, रा. मोंढाळा, ता. भुसावळ) असं या तरुणाचं नाव आहे. बुधवारी दुपारी 2 वाजता चिंचोली ता. जळगाव शिवारात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं ?
नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्स जवळ हे काम सुरू आहे. या कामावर मोंढाळा, ता. भुसावळ येथील कामगार रोज कामाला येत आहेत. बुधवारी दुपारी मुख्य वाहिनीच्या शेजारीच ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पोल उभे केले जात होते. त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्यानं पोलचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. पोलला धरणाऱ्या विशाल गायकवाड याला विजेचा जोरदार धक्का बसला. तर त्याच्या शेजारी असलेले ईश्वर एकनाथ शेळके (35), अक्षय वसंत घ्यार (22), हे लांब फेकले गेले तर विशाल याचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर आणि अक्षय हे जखमी झाले आहेत. दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही घटना घडल्यानंतर इतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांच्याशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. परंतु त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळं कामगारांनी संताप व्यक्त केला. वसंत घ्यार हे सुपरवायजर होते. काम सुरू असताना मुख्य वाहिनीचा वीज पुरवठा खंडित करायला हवा होता. परंतु सुरू ठेवणे तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगराांनी केला आहे.

विशालचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. तो अविवाहित होता. त्याचे वडिल सोपान उर्फ नकुल देवचंद गायकवाड आणि आई छाया मजुरी काम करतात. तर त्यांची मुलगी सुवर्णा अतुल शिंदे (रा. केकतनिंभोरा, ता जामनेर) सासरी असते. विशाल हा एकुलता एक आणि कमावता मुलगा होता. या घटनेनंतर कुटुंबानं प्रचंड आक्रोश केला.