‘अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. ते म्हणाले होते कि, जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. निलेश राणेंच्या या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे निलेश राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, त्यावरून निलेश राणेंनी अजितदादा याना प्रत्युत्तर दिले होते की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीही महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी दिला होता.

तसेच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले होते. तसेच कर्नाटक सीमा भागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही अजित पवारांनी व्यक्त केला.

त्यावर निलेश राणे म्हणाले आहेत की, अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही. इतक्या वर्षात त्या गावांना भेट देण्याकरिता कधी गेलात का? अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान राणेंनी अजितदादांना दिलं आहे. त्यामुळे निलेश राणेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं गरजेचे आहे.