आर्थिक वादातून युवकावर चॉपरने हल्ला, दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पैशांच्या वादातून एका युवकावर चॉपरने हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी सांगली शहरातील संजयनगर येथील लव्हली सर्कल परिसरात साडेबाराच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी या घटनेतील दोन आरोपींनी काही तासात अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

योगेश लिंगाप्पा बाबानगरे (वय-२२ रा. कुपवाड रस्ता, नेहरुनगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी इम्रान बंडू शेख (वय २३), वसीम करीम इनामदार (वय २४, दोघेही रा. मंगळवार बाजारजवळ, राजीवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सलमान कमरूद्दीन मुल्ला (वय २३, रा. राजीवनगर) याने फिर्याद दिली आहे. जखमी योगेश त्याचा मित्र सलमान मुल्ला व अतीक शेख याच्यासोबत मोटारसायकलवरून शिंदे मळ्यात गेले. तेथून ते लव्हली सर्कल परिसरात आले होते. तेथे अतीकने एका औषध दुकानातून औषधे खरेदी केली. त्यानंतर तिघेही मोटारसायकलवरून निघाले होते त्यावेळी हा हल्ला करण्यात आला होता.

लव्हली सर्कलजवळ आल्यानंतर इम्रान शेख व वसीम इनामदार मोटारसायकलवरून समोरून आले. त्यांनी हाक मारून योगेशला थांबायला सांगितले. त्यानंतर तिघेही थांबले. त्यावेळी इम्रानने योगेशच्या जवळ येऊन तुझी संजयनगर परिसरात खूप दादागिरी वाढली आहे असे म्हणत कानशिलात लगावली. त्यानंतर वसीमने कमरेला लावलेला चॉपर काढून योगेशच्या बरगड्यांवर वर्मी घाव घातला. नंतर इम्रानने त्याच्याकडील लोखंडी हत्याराची लाकडी मूठ त्याच्या डोक्यात घातली.

 योगेश तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले.  गंभीर जखमी योगेशला त्याच्या मित्रांनी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, खुनी हल्ल्याची घटना घडल्यानंतर संजयनगरचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी तातडीने हालचाली केल्या. जखमी योगेशच्या मित्रांकडे चौकशी केल्यानंतर हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर निरीक्षक पोमण यांच्यासह पथकाने तातडीने हालचाली करत पाच तासात दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

बुर्लीत युवकाचा चाकूने भोकसून खून 

पलूस : पलूस तालुक्यातील बुर्ली येथील  गणेश शांताराम शिखरे (वय २२) या युवकाच्या  पोटावर चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी  त्याच्याच भावकीतील  संशयित कुणाल चंद्रकांत शिखरे (वय २०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना  गुरुवारी (दि.१८) रात्री  बुर्ली  येथे  घडली. घटना घडल्यापासून ९ तासाच्या आत संशयित कुणाल याला पलूस पोलिसांनी  अटक केली.  पलूस न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे  आदेश दिले आहेत. महिन्यापूर्वी मृत गणेश शिखरे याने, ‘माझ्या बहिणीला अपशब्द का वापरलेस’,  अशी विचारणा करीत कुणालच्या कानफटात दिली होती. त्याचा राग मनात धरुन विजयादशमीदिवशी रात्री दुर्गामातेची विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच  कुणालने गणेशला मिरवणुकीतून बाहेर बोलवले. गावातील दादा चौकात दोघांची वादावादी सुरू झाली. या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यातच गणेशच्या पोटात चाकूचा घाव बसला आणि तो जागेवरच ठार झाला.

या घटनेनंतर संशयित कुणाल फरार झाला होता. रात्री उशिरा याबाबत पलूस पोलिसांना माहिती मिळाली होती.उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी सहायय्क पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील यांना   संशयिताचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचा ठावठिकाणा  शोधून काढण्यासाठी  उसाच्या शेतात आणि नदीकडेला रात्रभर शोध मोहीम राबवली.अखेर पोलिसांनी   त्याला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक  मोहिते  अधिक तपास करीत  आहेत.