काय सांगता : होय, आईस्क्रीमच्या वादातून डॉक्टरानं घेतला एकाचा जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आईस्क्रिम विकत घेत असताना झालेल्या किरकोळ वादातून एका टोळक्याने एका युवकाचा बेदम मारहाण करून खून केल्याची घडला घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळक्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. अमित शर्मा (वय-35 रा. 5 रोहिणी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बाईकवरून आलेल्या चौघांनी अमितला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाकल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक डॉक्टर असून त्याच्या भावाचाही यामध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शर्मा याचा पंजाब बाग परिसरात तेलाचा व्यवसाय आहे. तो 5-रोहिणी येथे आपल्या कुटुंबासमवेत रहात असल्याची माहिती त्याच्या मेहुण्याने पोलिसांना दिली. घटनेच्या रात्री अमित आपला मेहुणा आणि इशांत यांच्यासोबत जेवणासाठी बाहेर निघाले होते. त्यांना आईसक्रिम खायचे असल्याने ते आईस्क्रिमच्या शोधात फिरत होते. रोहिणी-6 भागात त्यांना आईस्क्रिमचा गाडा दिसला. आईस्क्रिम घेण्यासाठी ते गेले त्यावेळी बाईकवर चौघेजण त्या ठिकाणी उपस्थित होते.

आईस्क्रिम खरेदी करत असताना अमित आणि त्या बाईकस्वारांमध्ये वाद झाले. त्यानंतर अमित आपला मेहुणा आणि मित्राला घेऊन तेथून निघून गेला. ते मदर डिव्हाइन शाळेजवळ आले असता बाईकवरून आलेल्या चौघांनी अमितला काठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागेवरच कोसळला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत घोषीत केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन केवळ चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. करण (वय-29), लक्ष्य (वय-27), धीरज (वय-26) आणि छोटू (वय-27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी करण हा डॉक्टर असून लक्ष्य हा त्याचा भाऊ आहे.