‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणीला ‘गिफ्ट’ देणे तरुणाला पडले महागात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘व्हॅलेंटाईन डे’ला शुभेच्छा देण्यासाठी ‘गिफ्ट’ घेऊन तरुणीच्या घरी गेलेल्या तरुणाला प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चिखली येथे घडला आहे. परेश पाखले (रा. आकुर्डीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश हा फिर्यादी तरुणीचा मागील दोन महिन्यांपासून पाठलाग करत होता. तरुणीच्या मैत्रिणीकडून नंबर घेऊन तरुणीशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करीत होता. 14 फेब्रुवारी रोजी परेश याने तरुणीला व्हॅलेंटाईन दिवसाच्या शुभेच्छा देण्याचे ठरवले. तो गिफ्ट घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने घराची बेल वाजवली. तरुणीने दरवाजा उघडला. समोर परेश दिसताच ‘तू इथे का आला’ असे तरुणीने विचारले. परेशने आणलेले गिफ्ट तरुणीच्या अंगावर फेकले.

त्याच वेळी तरुणीच्या आईने कोण आहे, असं विचारलं. आईचा आवाज ऐकताच परेश जिन्यातून खाली गेला. तरुणीने परेश आला असल्याचे सांगितले. आई तात्काळ जिन्यातून खाली गेली आणि तरुणाला अडवले आणि ‘निघ इथून’ असे मोठ्याने ओरडली. त्यानंतर परेश तरुणीच्या आईच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करत तरुणीकडे जात असताना जमा झालेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

You might also like