एप्रिल महिना पुण्यासाठी राजकीय रणधुमाळीचा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

लोकसभेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत. लोकसभेसाठी स्थानिक पातळीवर इच्छूक असलेले उमेदवार सक्रीय झाले आहेत. विविध कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. पुणे राजकीय दृष्ट्या जागरूक आणि संवेदनशील असल्याने ज्येष्ठ नेत्यांचेही पुण्यात येणे, जाणे वाढलेले आहे. भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आठ तारखेला पुण्यात ‘गणेश कला क्रीडा’ येथे मेळावा होणार आहे.

मुंबईत सहा एप्रिल रोजी होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यासाठी पुण्यातून कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा नेण्यासाठी जमवाजमव चालू आहे.
याखेरीज आठ तारखेला भाजपचा वर्धापनदिन पुण्यात स्वतंत्रपणे साजरा केला जाणार आहे. या मेळाव्याला भाजपचे अनेक नेते उपस्थिती लावणार आहेत. भाजपच्या कायदा मंत्र्यांचाही मेळाव्यासाठी पुणे दौरा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची १२ तारखेला पुण्यात सांगता होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाची निवड या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. आंबेडकर जयंती निमित्ताने १४ एप्रिलला विविध पक्षांचे नेते पुण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा १७ तारखेपासून चार दिवस  मुक्काम पुण्यात रहाणार आहे. काँग्रेस पक्षाचे शिबीर पुण्यात घेण्याचे निश्चित होत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर नुकतेच पुण्यात येऊन गेले. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटना बांधणीच्या सूचना दिल्या.