गडाखांच्या घराची झडती : विविध क्षेत्रातील मान्यवरांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी आमदार शंकराव गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना त्यांच्याशी अशोभनिय वर्तन केल्याचा आरोप करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना लेखी निवेदन दिले आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी शनिवारी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झडती घेतली होती. शंकरराव हे घरात नाहीत, हे प्रशांत गडाख यांनी पोलिसांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही. गडाख यांच्या बेडरुमपर्यंत जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेत ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्याशी अशोभनीय वर्तवणूक केली. त्याचा निषेध करण्यासाठी साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सोमवारी निवेदन दिले.

गडाख शरण, पण अटक नाही

माजी आमदार शंकराव गडाख हे रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण येऊन मला अटक करा, अशी मागणी करीत होते. मात्र पोलिसांनी तुमच्या विरोधातील पकड वॉरंटची तारीख शनिवारपर्यंतची होती. तुम्ही घरी आढळून न आल्यामुळे तसा लेखी अहवाल देऊन वॉरंट शनिवारी न्यायालयात पाठविण्यात आलेले आहे. सध्या आमच्याकडे वॉरंट नाही. त्यामुळे अटक करता येणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे तीन तासानंतर शंकराव गडाख हे घरी परतले.