परिवहन कर्यालयात महापुरुषांच्या पंगतीत पंतप्रधान

विरोधकांच्या संतप्त प्रीतिक्रिया

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक अॅड.सचिन भोसले यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. परिवहन कार्यालयातील मोदी भक्तांच्या या कारभारावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे नगरगसेवक अॅड. भोसले हा कामानिमित्त चिखली येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यावेळी परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या कार्य़ालयात लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे त्यांना आढळून आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महान पुरुषांच्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे.
या विषयाकडे त्यांनी लक्ष वेधले असता परिवहन आधिकारी आनंद पाटील यांची भांबेरी उडाली. त्यांनी तात्काळ फोटो काढण्याचे आश्वासन अॅड. भोसले यांना दिले. या संदर्भात आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान शासकीय कार्यालयात महान पुरुषांच्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याने विरोधकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.