भाजपच्या झोपडपट्टी सेलच्या पदाधिका-याला मारहाण प्रकरणी अटक

निगडी: पोलिसनामा ऑनलाईन

घरामध्ये बसवलेल्या इन्व्हरटरचे पैसे मागण्यास गेलेल्या एका इसमला डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या झोपडपट्टी सेलच्या पदाधिका-याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवार (दि.9) रोजी निगडी येथील स्मशान भूमीजवळील गार्डनमध्ये सकाळी आकराच्या सुमारास घडला.मनोज पवार (रा. ओटा स्कीम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिका-याचे नाव आहे. तसेच त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तजिंदरसिंग सुरजितसिंग भाटीया (वय-47, रा. शुभश्री हौसिंग सोसायटी, देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज पवार याने घरामध्ये 21 हजार 500 रुपयांचे अॅटोबॅट कंपनीचे इन्व्हरटर भाटीया यांच्याकडून खरेदी केले आहे. भाटीया यांनी पवार याच्याकडे पैशांची मागणी केली परंतू पवार याने वेळोवेळी पैसे देण्यास टाळाटाळ केली. शुक्रवारी सकाळी आकराच्या सुमरास पैसे देण्याच्या बहाण्याने भाटीया यांना स्मशानभूमी जवळ बोलवले. ते पैसे घेण्यासाठी आले असता पवार याने त्यांना गार्डनमधील खोलीत घेऊन गेले. त्याठीकाणी त्यांना डांबून ठेवले तसेच पवार याच्या इतर दोन इसमांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

भाटीया पैसे घेण्यास गेले असता पवार याच्या साथीदारांनी त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच त्यांची 50 हजारांच्या व्हाऊचरवर पॅनकार्ड नंबर टाकून सही करण्यास सांगितले. सही करण्यास नकार दिल्याने तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मनोज पवार याने भाटीया यांच्या बॅगेतून त्यांचे आयसीआयसीआय बँकेचे चेकबुक घेऊन त्यातील दोन चेकवर त्यांची सही घेतली. त्यांच्या आधार कार्डच्या साक्षांकीत तीन प्रतीही त्याने घेतल्या. ऐवढ्यावर न थांबता त्याने भाटीया यांना परत पैसे मागण्यास आला तर याच स्मशान भूमीत जाळून मारुन टाकण्याची धमकी दिली.

भाटीया यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोज पवार याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.