मुंबई 26/11 च्या हल्ल्यातील ‘साक्षीदार’ श्रीवर्धन यांना भाजपकडून 10 लाखांचा धनादेश

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यात प्रमुख साक्षीदार असलेले हिरिश्चंद्र श्रीवर्धन यांच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांचा धनादेश भाजप आमदार व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते घरी जाऊन देण्यात आला. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली होती.

यावेळी भाजप खासदार कपील पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप नगरसेवक दया गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. कसाबच्या खटल्यात महत्त्वाची साक्ष देणारे श्रीवर्धनकर हे मुंबईत रस्त्याच्या कडेला एका दुकानदारस आढळून आले होते. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना कल्याणला पाठवले गेले.

कल्याणच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ही बाब समजताच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 11 मे रोजी कल्याणच्या खासगी रुग्णालयात येऊन श्रीवर्धनकर यांची भेट घेतली होती. त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च भाजपकडून केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी भाजप आमदार चव्हाण यांच्या हस्ते श्रीवर्धनकर यांचे चिरंजीव मंगेश यांच्या हाती 10 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.