ऑनलाईन ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,१४ नायजेरियन अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत सुरु आहे. नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार पार्टी करण्याचे आयोजन तरुणाई करीत आहे. त्याचबरोबर ड्रग्जची तस्करी करणारे देखील सक्रीय झाले असून मुंबईतील पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा वापर केला जातो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वेळीच उपाययोजना आखून तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश करुन १४ नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

दरवर्षी नववर्षाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे मुंबईत ड्रग्जची मागणी वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व ड्रग्जचा व्यापार वाढवण्यासाठी अनेक ड्रग्ज तस्कर मुंबईसह आसपासच्या परिसरात येतात. या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत.

ऑनलाईन पद्धतीने ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांना पर्दाफाश केला आहे. या टोळीतील १४ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडील मोठया प्रमाणातील ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी १५ डिसेंबरपासून कॉम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामध्ये 7 नायजेरियन नागरिकांना एमडी, ब्राऊन शुगर, कोकेनसह पकडले. त्यापैकी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटले.

पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांनी सांगितले की, सोमवारी 2 नायजेरियन भायखळ्यात दिसले. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांचे अजून काही साथीदार पकडले. गेल्या १२ दिवसांपासून मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे आतापर्यंत १४ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.

पकडलेल्या १४ नायजेरियन्सकडून पोलिसांनी २१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच एक पिस्तूल आणि काही काडतूसेही मिळाली आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार हे तस्कर ऑनलाईन आणि सोशल मीडियाद्वारे ड्रग्जची विक्री करत होते.