शहरातून मद्यतस्करी : साडेसोळा लाखांची दारू जप्त

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – शेंडी बायपास रस्त्यावरून मद्याची तस्करी करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. त्यातून साडेसोळा लाखांची दारू, टेम्पो असा सुमारे 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी भगवान बन्सी बढे (वय-४० वर्षे, रा. भिलवडे. ता – पाथर्डी, जि- अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, काल रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहीती मिळाली कि, एक सफेद रंगाचा टेम्पो (नं. एमएच-२०बीएस-११५८) यामधून विनापरवाना विदेशी दारु विक्रीसाठी एमआयडीसी शेंडी बायपास रोडने औरंगाबादचे दिशेने जाणार आहे. आता लागलीच नगर-मनमाड रोड शेंडी बायपास चौकाजवळ जावून सापळा लावल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोसइ सचिन खामगळ, कर्मचारी सोन्याबापू नानेकर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, मन्सूर सय्यद, रविन्द्र कर्डिले, राम माळी, संतोष लोढे, राहूल सोबँके, विजय ठोंबरे, सचिन अडबल, रवि सोनटक्के, विजय वेठेकर अशांनी मिळून दोन पंचासह नगर-मनमाड रोड, एमआयडीसी, शेंडी बायपास चौकाजवळ जावून सापळा लावला.

त्यानंतर काही वेळातच मिळालेल्या बातमीनूसार एक सफेद रंगाचा टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो मनमाड-नगर रोडने आला. त्यावरील चालकाने शेंडी बायपास चौकातून औरंगाबादकडे जाणेसाठी टेम्पो वळविला. त्याचवेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी खासगी गाडी टेम्पोचे पुढे आडवी लावून टेम्पो अडविला. त्यावरील चालकास ताब्यात घेतले. टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स भरलेले आढळून आले. त्याबाबत चालकाकडे दारु वाहतूकीचे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने वाहतूकीचा परवाना नसल्याचे सांगीतल्याने सदर टेम्पोमध्ये असलेली १६ लाख ४१ हजार ६००-रु. किं. ची दारु, त्यामध्ये व्हाईट मिस्चीफ वोडका, ब्लॅक डिलक्स व्हिस्की, डॉक्टर स्पेशल हिस्कीचे एकूण २५६ बॉक्स व ३,००,०००-रु. किं. चा टेम्पो असा एकूण १९ लाख ४९ हजार ६०० रु. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.