Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 23365 नवे पॉझिटिव्ह तर 474 रूग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. काल राज्यात कोरोना बाधित मृत्यूंच्या आकडेवारीने उच्चांक गाठला होता. आज पुन्हा राज्यात 474 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 30 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 2.75 टक्के आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 11 लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 23 हजार 265 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 21 हजार 221 वर पोहचली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढत आहे. सध्या राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 20.36 टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 17 हजार 559 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 7 लाख 92 हजार 832 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.7 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 2 लाख 97 हजार 125 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजच्या घडीला 17 लाख 53 हजार 347 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 36 हजार 462 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 55 लाख 6 हजार 276 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 21 हजार 221 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर इतरांचा निगेटिव्ह आला आहे.