Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 2436 नवे रुग्ण तर 60 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 52000 पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज 2436 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 52 हजार 667 वर पोहचली आहे. राज्यात आज दिवसभरात 60 रुग्ण दगावले आहेत. त्यात एकट्या मुंबईत 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 1186 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यभरात 15 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 35 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.


आज एका दिवसात राज्यभरातून 1186 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक 900 रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52 हजार 667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 30 हजार 247 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 479 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 60 करोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण संख्या 1695 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित 6 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. आज मृत्यू झालेल्या पैकी मुंबईत 38, पुण्यात 11, नवी मुंबई 3, ठाणे 2, औरंगाबाद शहर 2, सोलापूर 1, कल्याण डोंबिवलीमध्ये 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय बिहारमधील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे.