सोलापूर-विजापूर महामार्गवर 18 तासांत 25 KM चा रोड, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतुक करण्यात येते. गडकरी यांनी देशातील रस्त्यांच्या कामातून स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. शहरांमध्ये फ्लाय ओव्हर बांधणे असो किंवा राष्ट्रीय आणि राज्य मार्गांचा रस्ता असो, चौपदीकरण असो किंवा आठ पदरीकरणाचा रस्ता बांधणे असो नितीन गडकरी यांचे नाव निघाल्याशिवाय राहत नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरुन जाताना आपल्याला गडकरींच्या कामाची प्रचिती येते. त्यांच्या या कामामुळे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हे गडकरींना रोडकरी म्हणून संबोधायचे.

आता पुन्हा एकदा गडकरींच्या नेतृत्त्वात सोलापूर-विजापूर महामार्गवरील रस्ते बांधकामाने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सोलापूर विजापूर मार्गावर १८ तासात २५.५४ किमी रस्ता (एक पदरी) बांधण्यात आला आहे. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असल्याचा दावा नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करताना, २५.५४ किलोमीटरचा सिंगल लेन रस्ता १८ तासांत पूर्ण करण्यात आला आहे.

हा रस्ता बनवण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या ५०० कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले आहे. या कर्मचाऱ्यांसह मी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना प्रबंधक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे सर्व प्रतिनीधी आणि परियोजना अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असे गडकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोलापूर-विजापूर राज्यमार्गाच्या ११० किमीचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे गडकरींनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

सोलापूर-विजापूर हा महामार्ग पूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जायचा तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडला जाणारा रस्ता एनएच ५२ नावाने ओळखला जायचा. सोलापूर आणि विजापूर चौपदरीकरणादरम्यान येथे बायपास रस्ते काढण्यात येणार आहे. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूल सुद्धा असणार आहे.