राज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामस्तरावर कामांच्या सुसूत्रतेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकांना यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे. थेट मानधन वितरणाचा हा नवा पॅटर्न जिल्ह्यातील कामठी तालुक्यात प्रथम यशस्वी झाला. त्यानंतर राज्यभार लागू करण्यात आला.

मानधन वाटपातील विलंब टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात आला. तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवकांच्या कामाचे 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंतच्या कामाचे 3 लाख 67 हजार 974 रुपयांचे अनुदान थेट संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात हा प्रयोग राबवण्याचा निर्णय मनरेगाचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी घेतला.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी ग्रामरोजगार सेवकांची महत्त्वाची भूमिका असून, रोहयोवरील मजुरांना त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तसेच मिळणारी मजुरी यांचे हजेरी बुक तयार करून मजुरांच्या खात्यात थेट मजुरी जमा करण्याची जबाबदारी आहे. राज्यात 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांमध्ये नागपूर विभागात 3 हजार 409, अमरावती विभागात 4 हजार, औरंगाबाद विभागात 6 हजार 344, नाशिक विभागात 4 हजार 861, कोकण विभागात 2 हजार 645 तर पुणे विभागात 3 हजार 996 ग्रामरोजगार सेवक आहेत. त्यांना या नव्या मानधन वितरण प्रणालीमुळे वेळेवर मानधन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.