शून्य अपघाताचे ध्येय गाठण्यासाठी पोलीस करणार विशेष प्रयत्न 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात आणि जिल्ह्यात शून्य अपघाताचे ध्येय गाठण्यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरदिवशी विविध ठिकाणच्या अपघातात चार जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरासह जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. मागील वर्षी अपघातात १ हजार ३६१ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता शून्य अपघातासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा सुरक्षा समिती, परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आजरी बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, नम्रता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, आनंद पाटील, विनोद सगरे, चंद्रशेखर चव्हाण, दत्ता सांगोलकर, ए. व्ही. मन्नीकर, बी. बी. आहुजा आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बाबासाहेब आजरी म्हणाले की, “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदीचा आलेख वाढला आहे. त्यामुळे दिवसाला दोन्ही शहरात १ हजार ५०० वाहनांची भर पडत आहे. अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालकामुळे अपघातात वाढ झाली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक असून चांगल्या सिटीबसची गरज आहे. दरम्यान, जुन्या बसेसमुळे अपघात होत आहेत.” इतकेच नाही तर, सद्यस्थितीत शहरात पाच हजार नवीन बसेसची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर टिळक यांनीही आपलं म्हणणं मांडलं. त्या म्हणाल्या, “शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. त्याद्वारे त्यांच्याकडून जनजागृती होण्यास मदत होणार आहे. आरटीओ कार्यालयाकडून लायसेन्स टेस्ट अधिक कडक व्हावी. तसेच शहरात ड्रक अँड ड्राईव्हची कारवाईमध्ये पोलिसांनी सातत्य ठेवल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल” असे महपौरांनी सांगितले.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, “रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये विध्यार्थ्यांचा स्कूलबस सुरक्षित प्रवास करणे, वाहतूक नियंत्रण आणि वाहतूक नियम जनजागृती करण्यात येणार आहे.”

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, “युध्दात जेवढे लोक मारले जात नाही तेवढे लोक जगभरात विविध अपघातात मृत्युमुखी पडतात. ते टाळण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. दरम्यान महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित ठिकाणच्या पोलीस स्थानकाचे १० टक्के कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहात हे कार्यक्रम आयोजित केले जाणार
सप्ताह मध्ये वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, विशेषतः ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे, वाहन चालकांना मार्गदर्शन करणे, अवैध वाहतूक, विना लायसेन्स वाहन तपासणी करण्यात येणार आहे.