विमानतळावर विमानाच्या शौचालयातून ३१ लाखांचे सोने जप्त

वास्को : वृत्तसंस्था – कुवेतहून लपवून आणलेले ३१ लाख ३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटे दाबोळी विमानताळावर करण्यात आली. हे सोने एअर इंडिया विमानाच्या शौचालयात लपवून ठेवण्यात आले होते. पकडण्यात आलेले सोने दाबोळी येथे आल्यानंतर तेथून चेन्नईला जाणार होते. मात्र, कस्टम विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तस्करीचे सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे या कारवाई करण्यात आली. कुवेतहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९७६) विमानात तस्करीचा माल असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी ह्या विमानाची तपासणी करण्यास सुरवात केली. विमानाच्या शौचालयात प्लास्टिक पिशवीमध्ये घालून ठेवलेले १ किलो  ८६ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे दिसून येताच ते ताब्यात घेऊन घेण्यात आले. यानंतर हे सोन्याचे दागिने कोणाचे आहेत काय अशी विचारपूस अधिकाऱ्यांनी केली असता त्या दागिन्यांसाठी कोणी दावा केला नसल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली. दाबोळीवर आलेले हे विमान येथून नंतर चेन्नईला जाणार होते व शौचालयात लपवण्यात आलेले हे तस्करीचे सोन्याचे दागिने दाबोळी विमानतळावरून चढणारा एक प्रवासी चेन्नईला उतरवून नेणार होता असा संशय कस्टम अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी या कारवाई केली असून तस्करीचे सोने कुठल्या प्रवाशाने ह्या विमानात लपविले होते व ते कुठे नेण्यात येत होते याबाबत कस्टम विभाग सध्या तपास करीत आहेत.

दाबोळी विमानतळावर ह्या आर्थिक वर्षाच्या (एप्रिल २०१८) सुरवातीपासून अजूनपर्यंत ७ किलो १४५ ग्राम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन याची एकूण रक्कम २ कोटी १४ लाख रुपये होत असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त अजूनपर्यंत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावरून ह्या अर्थिक वर्षापासून अजूनपर्यंत ३६ लाख ३८ हजार रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली असून ३८ लाख ९ हजार रुपयांची इतर सामग्री दाबोळी विमानतळावरून जप्त केल्याचे माहितीत सांगितले.