Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात आणखी 485 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उच्चांकी रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात गेल्या 24 तासात 485 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत पोलिसांचा आकडा 186 वर गेला आहे.

राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता 18 हजार 890 वर पोहचली आहे. यामध्ये 3 हजार 729 जण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 14 हजार 975 जण बरे झाले असून आतापर्यंत 186 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 485 पोलिसांची भर पडली आहे. आतापर्यंत दिवसाला तिनशे ते चारशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोना बाधित पोलिसांच्या आकड्याने चारशेचा आकडा पार केल्याने पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढताना दिसत आहे.

राज्यातील 18 हजार 890 कोरोना बाधित पोलिसांमध्ये 2 हजार 50 अधिकारी तर 16 हजार 840 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या 3 हजार 729 पोलिसांमध्ये 461 अधिकारी व 3 हजार 268 पोलीस कर्माचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या 14 हजार 975 पोलिसांमध्ये 1 हजार 573 अधिकारी व 13 हजार 402 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 186 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 16 अधिकारी आणि 170 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.