अकौंटंटकडून डाॅक्टरची 57 लाखांची फसवणूक 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यातील एका अकौंटंटवर तब्बल  57 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅक्टरांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शेखर गणपत शेळके (वय 25, रा. खिंडवाडी, ता. सातारा) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर बझारमधील एका हॉस्पिटलच्या औषधविक्रीतून तसेच दैनंदिन व्यवहारातून जमा झालेल्या तब्बल 57 लाख रुपयांचा अपहार केल्याची डाॅक्टरांची तक्रार आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शेखर शेळके हा 2017 पासून तक्रारदार यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये अकौंटंट पदावर कामाला होता. शेळके याच्याकडे हॉस्पिटलच्या मेडिकलमधील औषध विक्री, हॉस्पिटलच्या दैनंदिन व्यवहारातून जमा झालेल्या रकमेचा हिशेब तसेच त्याचा भरणा विविध बँकेत करण्याची जबाबदारी होती. हे काम करत असतानाच सर्व व्यवहार किर्दीत तसेच वहीत नोंदवून ठेवण्याचे काम शेळके करत होता.
नेमकं काय घडलं ?
दोन वर्षांपूर्वी जून 2017 मध्ये डॉक्टरांनी हॉस्पिटलचे आर्थिक व्यवहार तपासले. या तपासणीत डाॅक्टरांना औषधांची विक्री व भरणा यात सुमारे 40 हजार रुपयांचा फरक दिसून आला. हा फरक आढळल्यानंतर डाॅक्टरांनी शेळके याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित रक्कम जमा करतो, असे सांगितले. डाॅक्टरांच्या मनात संशय असूनही डॉक्टरांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून पुन्हा त्याच्याकडेच आर्थिक व्यवहार सोपवले. शेळके याच्यावर नजर ठेवत डाॅक्टरांनी तीन ते चार महिन्यांनी पुन्हा डॉक्टरांनी आर्थिक व्यवहार तपासले असता त्यांना 4 लाख रुपयांच्या रकमेचा फरक दिसून आला.

यावेळी पुन्हा डाॅक्टरांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. परंतु शेळके यांने हे गांभीर्याने न घेता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर मात्र डाॅक्टरांचा संशय अधिकच बळावला. यानंतर डाॅक्टरांनी मात्र संशय वाढल्याने जून 2017 ते 10 जानेवारी 2018 या  कालावधीतील आर्थिक व्यवहार तपासले. या तपासणीत मेडीकलची औषध विक्री, हॉस्पीटलमध्ये जमा होणार्‍या रकमेत 57 लाख 60 हजार रुपयांचा फरक आढळला. महत्त्वाचे म्हणजे, शेळके याने त्या कालावधीतील हिशोबाच्या वह्या, किर्द गायब केल्याचेही नंतर समोर आले.

या घटनेनंतर मात्र डाॅक्टरांनी  शेखर शेळकेची अधिक माहिती घेण्याचे ठरवले. त्यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर, त्याने शेळकेवाडी (ता.सातारा) येथे जमीन, सदर बझारमध्ये प्लॉट तसेच इतर ठिकाणी गुंतवणूक केल्याचे समजले. सर्व प्रकार लक्षात आल्यानतंर डाॅक्टरांनी पैशांबाबत विचारणा करुन ते न दिल्यास पोलिस केस करणार असल्याची चेतावणी दिली. यावेळी शेखर शेळके याने पैसे परत करतो परंतु तुम्ही केस करू नका अशी विचारणा केली. शेळके याने वेळ घेऊनही पैसे काही परत केले नाही. हे पाहून सोमवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.