बोअरवेलमध्ये पडलेला ‘त्या’ मुलाची १५ तासांनी सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव  येथे २०० फुट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची १५ तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न करून गुरुवारी सकाळी त्याला बागेर काढले.

रवी पंडित असं बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव आहे.

पुण्यातील मंचर परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने त्या कामासाठी आलेले कामगार तेथे राहतात. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता.तेथे असलेल्या बोअरवेलला कोणतेही झाकण लावण्यात आलेले नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला होता. सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याची माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रविला सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी गुरुवारी सकाळी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं आहे.