६० अर्भकांचे मृत्यू प्रकरण रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणामुळे घडले : योगी आदित्यनाथ

गोरखपूर : वृत्तसंस्था

गेल्या वर्षी गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात ६० अर्भकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते. आता घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन खुलासा केला आहे. ६० अर्भकांचा मृत्यू प्राणवायूच्या कमतरतेमुळे नव्हे तर रुग्णालयातील अंतर्गत राजकारणातून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा विनाकारण बाऊ करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B00LHZW3XY,B00J4YG0PC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d38c59e-a9b8-11e8-84a0-cb167dc9e17a’]

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या अंतर्गत राजकारणाचा हा परिणाम असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले असे आदित्यनाथ यांनी सांगितले. याविषयी डॉक्टरांचेच समुपदेशन आम्हाला करायला लागणे हे वेदनादायी आहे. तसेच मेंदूज्वर या आजाराच्या कारणाचा अभ्यास करा व हातात जी जबाबदारी आहे ती पार पाडा, असा सल्लाच आदित्यनाथ यांनी डॉक्टरांना दिला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच मी रुग्णालयात भेट दिल्यावर प्राणवायूचा तुटवडा नसल्याचे निदर्शनास आले होते. जर प्राणवायूचा तुटवडा असता तर व्हेंटिलेटवर जी मुले आहेत ती पहिल्यांदा दगावली असती, असे आदित्यनाथ म्हणाले.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आठवडाभरात ६० मुलांचा बळी गेला होता, त्यात प्रामुख्याने नवजात बालकांचा समावेश होता. प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला पैसे न दिल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र उत्तर प्रदेश सरकारने हा आरोप फेटाळला होता. या घटनेनंतर राज्याचे आरोग्य संचालक, आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. कफील खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामिनावर सोडण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याची चौकशी करून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात खान यांचा समावेश आहे.

अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती गोपनिय : केंद्रीय माहिती आयोग