पुणे शहरात ‘थर्टी फर्स्ट’साठी ६ हजार पोलिस तैनात 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये विविध उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. थर्टी फर्स्ट हा मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव असून सरकारने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत हॉटेल, बार व परमिटरूम  सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याचबरोबर नववर्षाचा आनंद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शहरात नववर्षाच्या स्वागताला तरुणी व महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. म्हणून पाच छेडछाड विरोधी पथके तयार करण्यात आली असून याच्या प्रमुख पाच महिला पोलीस अधिकारी असणार आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी एक जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व दारूविक्री सुरू राहणार असून स्पिकरला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जात असले तरी. त्यासाठी त्यांना पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
शहरात डेक्कन, कोरेगाव पार्क, लष्कर, मुंढवा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने येथील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पुणे शहरात एकूण सहा हजार पोलिस रात्रभर रस्त्यावर राहणार असून शहरांच्या सर्व प्रवेशद्वारांवर ३१ डिसेंबरला एकूण २२ ठिकाणी  नाकाबंदी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, कोरेगाव पार्क, महात्मा गांधी रस्ता या भागात मोठी गर्दी असते. या ठिकाणी किरकोळ कारणावरून होणारी भांडणे टाळण्यासाठी, एकाच ठिकाणी गर्दी जास्त वेळ थांबू नये, यासाठी स्ट्रायकिंग फोर्स लावण्यात आल्या आहेत. याबरोबरच गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकाचौकात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्याच्या विरोधात ३०० पेक्षा जास्त ब्रेथ अ‍ॅनलायझरच्या साह्याने वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत.