तबलिगी जमातविरूध्द मध्य प्रदेशात पोलिसांची अ‍ॅक्शन, 60 हून अधिक विदेशी सदस्यांना केलं अटक

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश पोलिसांनी तबलीगी जमातविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन (फॉरेनर्स अ‍ॅक्ट आणि भारतीय दंड संहितेचे उल्लंघन) केल्याप्रकरणी पोलिसांनी तबलीगी जमातच्या निजामुद्दीन मरकझमध्ये सामील झालेल्या ६० हून अधिक परदेशी नागरिकांना अटक केले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भोपाळच्या विविध पोलिस ठाण्यात या आरोपींविरोधात सात गुन्हे दाखल होते.

भोपाळ रेंजचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) उपेंद्र जैन यांनी सांगितले की, तबलीगी जमातमधील परदेशी सदस्यांविरूद्ध व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे लोक टूरिस्ट व्हिसावर आले आहेत परंतु या लोकांनी धार्मिक कार्यात भाग घेतला होता, जेव्हा त्यांना नियमांनुसार तसे करण्याची परवानगी नव्हती. हे व्हिसा अटींचे उल्लंघन आहे जे परदेशी कायद्यानुसार गुन्हा आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी जैन यांनी सांगितले की, आरोपींना अटक करुन त्यांना न्यायालयात दाखल केले गेले, जिथे त्यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी शहरातील ऐशबाग येथील श्यामला हिल्स, पिपलानी आणि तलैया पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या सात एफआयआरच्या आधारे ६४ परदेशी तबलिगीना अटक करण्यात आली. आरोपींना आयपीसी कलम-१८८, कलम-२६९, कलम-२७०, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि परदेशी कायदा संबंधित कलमांतर्गत अटक केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तबलीगी जमातमधील या परदेशी सदस्यांपैकी काहींमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले गेले आणि उर्वरित सदस्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, तबलीगी जमातचे परदेशी सदस्य किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकीस्तान, तंजानिया, दक्षिण आफ्रिका आणि म्यानमारचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.